काजवा महोत्सव. याचे आयोजन केल्याची बातमी वाचली. लहानपणी जे आपल्या गावी गेले असतील आणि आजही जे गावांत राहात असतील त्यांच्यासाठी याचे काही विशेष वाटणार नाही. आम्ही लहानपणी मे महिन्यात कोकणांत गावी जात असू. शाळा जून च्या पंधरवड्यात सुरु होत असल्यामुळे मिरगा पर्यंत (मृग नक्षत्र लागेपर्यंत) गांवी मुक्काम असायचा. वैशाख संपून ज्येष्ठ महिना चालू होण्याचा हा कालावधी! वैशाख वणवा थांबण्याचा आणि पाऊसाचा शिडकावा सुरु होण्याचा हा काळ. धान्य साठवणे, लाकूडफाटा जमा करून ठेवणे, घर शाकारणे, झड्या बांधणे अशी कामे नुकतीच हातावेगळी केलेली असायची. वातावरण कुंद झालेले. वेगवेगळे कीटक दिसू लागायचे. उडणाऱ्या मुंग्या दिसायच्या आणि पावसाळा जवळ आल्याची चाहूल लागायची. आणि रात्री काजवे दिसू लागायचे. अंधारात एखादा काजवा चमकत जायचा आणि आम्हा मुलांचे लक्ष वेधायचा. किती अप्रूप वाटायचे. जसा पावसाळा जवळ यायचा तसे समोरचे भेंडी चे झाड काजव्यांनी भरून जायचे. आजू आजुबाजीची झाडे आंब्याची, फणसाची, जांभळाची चमचमणाऱ्या काजव्यांनी भरून जायची. त्या गूढ अंधारात (त्यावेळी गावांत लाईट न्हवती) भीती च्या अंमळ अंमलाखाली डोळ्यांचे पारणे फेडणारा हा काजवा महोत्सव अंगावर शहारा आणायचा, मन थक्क करून टाकायचा. रात्री गावांत फिरतांना काजव्यांच्या प्रकाशानी चमचमणारी झाडे मंद दिव्यांची रोषणाई केल्यासारखी वाटायची. काजवे एवढे असायचे की त्यातले काही उडत उडत घरात यायचे. त्यांना हातावर घेऊन पाहतांना खूप मजा यायची. जास्तीचे काजवे मग आम्ही मुले काचेच्या बाटलीत भरायचो आणि ती बाटली अंधाऱ्या खोलीत नेऊन तिचा बॅटरी सारखा वापर करता येईल का ते पाहायचो. सकाळी बाटली उघडून पाहायचो तर काही काजवे मेलेले असायचे आणि काही काजव्यांच्या उजेडाचे तेज कमी झालेले असायचे - अशा काजव्यांना आम्ही सोडून द्यायचो. पुढे रोज रात्री काही दिवस हा काजवा महोत्सव आम्ही रोज पाहायचो. मुंबई ला गेल्यावर काजव्यांनी फुललेली झाडे आठवत राहायची. आताही कधी मधी काजवे दिसतात पण लहानपणी पाहिलेले काजवे आणि त्यांचा मंद प्रकाश आणि रात्रीच्या अंधारात त्या मंद प्रकाशात झाडे चमकवणारे काजवे - ते गूढरम्य वातावरण, तो काजवा महोत्सव अजून विसरलो नाही आणि त्याची सर आता आयोजित केलेल्या काजवा महोत्सवाला येणार नाही हे नक्कीच.
- प्रकाश दिगंबर सावंत 08 June 2024
No comments:
Post a Comment