Saturday, 7 April 2012

कोणे एके काळी ...मुंबईत ... (once upon a time in Mumbai...)

कोणे एके काळी ...मुंबईत ...

कोणे एके काळी ...मुंबईत ...टांगे होते. त्यांना विक्टोरिया म्हणत. घोडा जुंपलेला टांगा टप टप करत रस्त्याने जात असे. रस्त्यावर घोड्यांची लीद, गवत पडलेले असे. त्याचा वास आसमंतात पसरलेला असे. घोडा गाड्या होत्या म्हणून घोड्यांचे तबेले होते. त्या काळी ट्राम पण होत्या. हळू हळू रस्त्यावरून मुसाफिराना घेवून जात असे. ट्राम येताना एक विशिष्ट घंटी वाजवत येत असे. त्या काळी पहा पर्यावरणाला हानी न करणारी वाहने मुंबईमध्ये अस्तित्वात होती. पनवेल, उरण, अलिबाग अशा ठिकाणी जाण्यासाठी launches होत्या. कोकणात जाण्यासाठी चौगुलेंच्या आगबोटी होत्या. समुद्र मार्गाचा परिवहनासाठी वापर होत होता. समुद्र तस्काराना स्मगलिंग साठी आंदण दिला गेलेला न्हवता. बस गाड्यांवर इंग्लिश मध्ये BEST लिहिलेले असायचे. कंडक्टर व चालकाना cap घालणे कम्पल्सरी होते. दुमजली बसमध्ये सामान ठेवण्यासाठी दरवाज्याजवळ जाळीचा stand असायचा. त्यात भाजीवाले, डबेवाले, कोळणी आणि आर्व सामान्य लोक आपापल्या घरी घेवून जाण्यासाठी घेतलेले सामान जसे पिंप, गोण्या , पोती ठेवू शकत असत आणि त्या "लगेज" चे तिकीट घ्यावे लागत असे. कालान्ताराने ते stand काढले गेले आणि त्या खबदाडीत माणसे उभी राहू लागली.  त्यावेळी बस च्या रूट ना नंबर न्हवते - A, B, C, D. E, F. G ..... असे रूट होते. एफ रूट ची बस गिरगावात जायची असे अंधुक आठवते. मुंबई वाढू लागली आणि A to Z  रूट कमी पडू लागले आणि मग 1, 2, 3, 4 असे नंबर आले. ते पण इंग्रजीत असत. नंतर BEST जे बस वर लिहिलेले असे त्याचे बेस्ट झाले आणि नंबर आणि बस चा मार्ग दाखवणारे बोर्ड मराठीत आले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे taxi चा मीटर जे भाडे दाखवी त्याप्रमाणे पैसे घेतले जात असत. वेगळी भाडे पत्रिका ठेवायाची गरज न्हवती. taxi मध्ये पण दोन प्रकार होते - छोटी taxi आणि बडी taxi. तसे का हे मला अजूनपर्यंत तरी कळले नाही. ह्या व्यतिरिक्त लाकडी स्ट्रक्चर असणार्या लोकल होत्या. रेल्वे फलाटावर म्यनुअल दर्शक होते. कुठली लोकल तेज, कुठली धीमी, कुठली कुठे थांबणार नाही हे सांगणारे लाकडी दर्शक असायची आणि त्यासाठी खास माणूस ठेवलेला असायचा - त्याचे काम त्या लाकडी दर्शकावारचे पुढच्या लोकलची वेळ सांगणारे घड्याळ सेट करायचे आणि ती लोकल तेज की धीमी ते दाखवायचे. आता इलेक्ट्रोनिक दर्शक आले आहेत. कोळशावर चालून धुरांच्या रेषा हवेत काढणाऱ्या आग गाड्या होत्या. आज त्यात रिक्षांची भर पडली आहे.

कोणे एके काळी ...मुंबईत... एक आणा, दोन आणे (चवली), चार आणे (पावली), आठ आणे अशी नाणी होती. तसेच एक पैसा, दोन पैसे, तीन पैसे, पाच पैसे, दहा पैसे, बंदा रुपया अशी नाणी होती. वेड्या माणसाला पावली कम म्हणत असत हे पण आता आठवते. आजी त्यावेळी म्हणाली होती की फार पूर्वी (इंग्रजांच्या राज्यात) काठीला सोने लावून अगदी सुरक्षित पणे मुंबईत फिरू शकत असत आणि कोणाचीही सोने चोरायची बिशाद नसायची आणि आता पुण्यात बाईक वरून साखळ्या चोरणारे सर्वत्र दिसू लागले आहेत. काही लोक असे म्हणत कि एक पैशात पान, सुपारी, तंबाकू येत असे. आता तर चार आणे पण चलनातून बाद झाले आहेत.

कोणे एके काळी मुंबईत पोलिसांचा दबदबा होता. लंडन पोलिसांनंतर मुंबई पोलिसांचा नंबर लागत असे. मुलांना घाबरवण्या साठी पोलिसांचे नाव घेतले जात असे. हप्ते बाजी होती पण मर्यादित असावी. गुन्हेगार आणि पोलीस आणि नेते ह्यांचे साटे लोटे आज जेवढे आहे तेवढे न्हवते. श्रीकांत सिनकर ह्यांच्या पोलीस तपास कथा त्यावेळी लोक आवडीने वाचत असत. रामन राघवन ने मात्र मुंबई पोलिसाना बराच चकमा दिला होता. मंदा पाटणकर मर्डर केस पण त्यावेळची गाजलेली गुन्हेगारी केस होती. प्रमोद नवलकर मुंबई चा "भटक्या" म्हणून फेमस होते.पोलीस हवालदार त्यावेळी हाफ प्यांट घालत असत - कंडक्टर, पोस्टमन लोक फूल प्यांट आणि पोलीस हाफ प्यांट. नंतर पोलिसांना खाकी रंगाची फूल प्यांट देण्यात आली - ट्राफिक हवालदारांना पांढरा शर्ट आणि दुसर्याना खाकी शर्ट देण्यात आला. हाफ प्यांट असणारा निळा ड्रेस घातलेले पोलीस किंवा पांढरा ड्रेस घातलेले ट्राफिक हवालदार आता फक्त जुन्या सिनेमातच दिसतात.

कोणे एके काळी ...मुंबईत ...  बर्याच ठिकाणी पांढर्या युनिफोर्म मधले हवालदार रहदारी नियंत्रित करत असत. त्याना सावली मिळावी म्हणून चौकात गोल किंवा चौकोनी टपरी उभी केलेली असे. खुद्द हवालदार उभा असल्याने वाहतुकीचे नियम पाळले जात असत. त्या मानाने वाहने खूप कमी होती. स्वयंचलित दिवे आले आणि मग गाड्या चालवणारे स्वयंचलित नियम बनवू लागले आणि ती पद्धत अजून चालू आहे.

कोणे एके काळी ...मुंबईत ... अंडर ग्रावुंड ग्यास पुरवठा होता. बॉम्बे ग्यास कंपनी पुरवठा करत असे. रस्त्या रस्त्या वर काच असलेले लाल रंगाचे फायर अलार्म होते. आग लागली की काच फोडायची की त्या ठिकाणी बंब हजर! पुढे पुढे टवाळकी करणारी पोरे मुद्दाम काच फोडून बंब वाले खरोखर येतात की नाही ते पाहू लागले किंवा आपल्या विभागात पाणी येण्यासाठी काच फोडू लागले आणि हे लाल रंगांचे फायर अलार्म नाहीशे झाले. त्याचप्रमाणे hydrant ज्याला आग विझवण्यासाठी भरपूर पाणी येत असे - ते पण ह्या शहराच्या वाढी मध्ये भूमिगत झाले ते कायमचेच.

कोणे एके काळी मुंबानागरी ची सीमा सायन आणि वांद्र्या पर्यंत मर्यादित होती. त्यापुढे जायचे म्हणजे बाहेरगावी जोतो असे मुंबईकर म्हणायचे. गिरणगाव हा त्या मुंबानागारीचा अविभाज्य भाग होता. गिरण्यांचे एक वेगळे विश्व त्याकाळी अस्तित्वात होते. सतत धडधडणाऱ्या गिरण्या, तीन शिफ्ट मध्ये कामावर जाणारे कामगार. नुसती गजबज चालू असायची. ह्या गिरणी कामगारांना लागणाऱ्या गोष्टी - जसे अमृत तुल्य (गुलाबी चहा, बदामी चहा, आल्याचा चहा, वेलची  चहा - त्यांच्या कप बशा पण वेगळ्या असायच्या - त्यावर शंकर विलास हॉटेल असे गुजराती मध्ये प्रिंट केलेले  असायचे ) चहाची "शंकर विलास हिंदू हॉटेल", सुपारी- तंबाखू साठी पानाच्या गाद्या, दुग्धालये, इराण्यांची हॉटेले इत्यादी.
शंकर विलास हॉटेलांमध्ये चहा पण्यासाठी नेहमी वर्दळ असायची. इराण्यांची हॉटेले कोपर्यांवर असायची - त्यांचे बन मस्का, केक, खिमा पाव, आम्लेट पाव हे खास पदार्थ आणि कटिंग चहा हा खास मेनू असायचा.
त्यांच्या हॉटेल मध्ये जूक बॉक्स असायचा - आपल्या आवडीची रेकोर्ड लावण्यासाठी. टाईम पास करण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे इराण्याचे हॉटेल असे समीकरण होते - आजही आहे. थंडा मतलब कोका कोला - हो कोका कोला त्यावेळी होता - पेप्सीचा जन्म झाला न्हवता. गोल्ड स्पोट आणि फांटा पण होता. सोसयो नावाचे ड्रिंक पण प्रसिद्ध होते. "थंडा मिठा सोसयो" अशी त्याची क्याच लाईन  होती.
भोंग्याच्या आवाजावरून कुठल्या गिरणीचा भोंगा ते ओळखणारे लोक होते. भोंग्याच्या वेळे वरून घड्याळ लावले जात असे. शिफ्ट चालू आणि बंद होण्याच्या वेळी गिरणगाव जत्रे सारखे भरून जात असे. गिरणी कामगारांची एक वेगळी दुनिया होती. स्वस्थ रहाणारे शहाणे होते तसेच जीवाची मुंबई करणारे वेडेही होते. भजनी मंडळ चालवणारे होते तसेच बेवडेगिरी करणारे होते. पै पै जमवून स्वताची खोली घेणारे होते आणि एकेका खोलीत बारा बारा जण राहून साठवलेला पैसा आपल्या गावी पाठवणारे होते.  आज सुना सुना झालेला गिरणगाव पाहून ज्यांनी पूर्वीचा भरलेला गिरणगाव पाहिला आहे त्याना नक्कीच भरून येईल.

पुढे मुंबापुरी वाढली - पार बोरीवली आणि मुलुंड पर्यंत गेली - इकडे मानखुर्द पर्यंत पसरली. पण पसारा वाढायच्या आधी दलदल होती, खाचरे होती, मिठागरे होती, खाडी होती. त्यावेळी कोकणात जाताना पहिले स्टेशन ठाणे लागत असे - नंतर पनवेल - मग पेन -आणि गाडी कोकणाच्या मार्गी लागत असे. कारण त्यावेळी वाशी चा खाडी पूलच न्हवता. आता असणार्या RCF आणि HP/BP refinary चक्क शहराच्या बाहेर होत्या. इकडे कोण रहायला येणार अशी लोकांची धारणा होती. त्यामुळे मुंबईत जागा सहज मिळत होत्या. भाड्याने, पाग्डीवर पण जागा उपलब्ध होत्या. अनामत रक्कम प्रकार न्हवता. २ ते १० रुपये हि त्यावेळच्या भाड्याची रेंज होती. आपल्या नावाचा फ्ल्याट हवा असा विचार कोणाच्याच मनात नसायचा. बिल्डर आणि संडास बाथरूम असलेली ओनरशिप खोली हे शब्द अजून जन्मायचे होते. सांताक्रूझ ला विमानतळ होता. त्यापुढे पवन हंस चा प्रायवेट विमानतळ, आणि नंतर दलदलीची खाचाची मोकळी जागा.
कोण जातो मरायला तिकडे  अशी भावना. खार, सांताक्रूझ तर त्यावेळी एकदम सामसूम; त्यापुढे तबेले आणि शेते. फार काय वरळी गावातून
जेंव्हा आम्ही नागू सायाजीच्या वाडीतून चालत शाळेत जात असू तेंव्हा तिथे शेते होती आणि पायवाटेने चालत आम्ही किस्मत सिनेमा कडे बाहेर पडत असू. ती शेते व पायवाटा पाहून गावाची आठवण हमखास येत असे.


कोणे एके काळी मुंबईत सरकारी दूध मिळत असे. स्वस्त असे. वरळीच्या आणि गोरेगावच्या डेरी मधून त्याचा पुरवठा केला जात असे. त्यासाठी पत्र्याचे कार्ड खास दुधासाठी सरकारने इशू केलेले होते. त्या पत्र्याच्या कार्डवर यजमानाचे नाव, पत्ता कोरलेले असे. ते घेवून दूध केंद्रावर सकाळी किंवा दुपारी जावे लागत असे. मोठी झुंबड उडत असे. केंद्रावर असलेल्या बाईचा किंवा बाप्याचा वशिला - ओळख असेल तर मग तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. काही लोकांनी तर दूध आणण्यासाठी खास बाया, मुले, बाप्प्ये ठेवलेले होते. आज दुध एवढ्या सहज मिळत असलेले पाहून त्याकाळी आपण दुध केंद्रावर दोन बाटल्या घेण्यासाठी किती यातायात करत होतो ते  आठवले कि हसायला येते. बाटल्या  (२, ४, ६ किंवा ८) ठेवण्यासाठी खास ट्रे मिळत - ते आता पूर्णपणे नामशेष झालेत.

कोणे एके काळी ...मुंबईत फ्यामिली डॉक्टर नावाची संस्था अस्तित्वात होती. आई, बाबा, काका, आत्या - सर्वांना ह्याच डॉक्टर कडे नेले जायचे. डॉक्टर ला सर्वांचा इतिहास माहित असायचा. एखादा जास्त आजारी असेल तर डॉक्टर दवाखान्यात जाताना अथवा घरी परतताना पेशंट ला बघण्यासाठी डोकावून जात असे. जर पेशंट ला हॉस्पिटल मध्ये दाखल करायची वेळ आली कि ह्या डॉक्टर चा शब्द फायनल असायचा. एक्स्पर्ट अजून जन्मायचे होते. आज हि संस्था मरणोन्मुख आहे. ह्याचप्रमाणे टेलर पण त्याकाळी कुटूंबाचे अगदी लंगोट, चटेरी पटेरी चड्ड्या, लेंगे, शर्ट, प्यांट, सूट शिवून देत असत. रेडी मेड कपडे सहसा घेत नसत. रफू करणारे काही कारागीर त्यावेळी होते. फाटलेले कपडे अगदी अशा  सफाईदार पाने शिवून देत असत की फाटलेली जागा सहज दिसत नसे. रफा दफा होत असे - म्हणून कदाचित रफू म्हणत असावेत. त्याकाळी "कपडे फाटके असले तरी चालतील पण स्वछ असावेत " असा अलिखित दंडक होता. आज चांगली असलेली जीन ढोपरावर, ढुंगना वर मुद्दाम फाडायची फ्याशन आली आहे. आता रफू करणार्या ऐवजी उसवणारे धंधा चांगला करतील. त्या काळी खास कपडे धुण्यासाठी BAND BOX नावाची कंपनी होती! आधी मला ती बाजा पेटी वाल्यांची कंपनी वाटली होती. पण नंतर कळले की खास कपडे वाशिंग साठी खास दर असलेली ती त्या कालची एक प्रीमिअम लौंड्री कंपनी होती.

कोणे एके काळी ...मुंबईत ... तांब्या पितळेची भांडी वापरली जात असत - पत्र्याच्या बादल्या असायच्या. त्या भांड्याना कल्हई करण्याचा एक मनोरंजक कार्यक्रम व्हायचा - तो पहाण्यासाठी आम्ही पोरे टोरे कल्हई वाल्या समोर गोल करून उभे रहात असू. मलूल झालेली भांडी कल्हई झाल्यावर कशी चमकदार नव्या सारखी व्हायची . पत्र्याच्या बादली ला तळ लावणे, कडी लावणे ह्या गोष्टी मध्ये कारागिराचे कौशल्य पहाण्यात मजा येत असे. पुढे जर्मन - अल्युमिनिअम, स्टील , प्लास्टिक ची भांडी आली आणि हे कारागीर बेरोजगार झाले - नामशेष झाले.

कोणे एके काळी ...मुंबईत... लुंगी घालण्याची फ्याशन आली होती. मुंबई आहे कि मद्रास आहे अशे कन्फ्युजन होवू  लागले होते. फक्त फरक एवढाच कि मुंबई मध्ये रंगीबेरंगी लुंग्या होत्या. घरात, रस्त्यावर, शेजारी जाण्यासाठी, जवळच्या दुकानात जाण्यासाठी लुंगी वापरली जात होती. काही मुली तर महाविद्यालायामध्ये लुंगी घालून येत असत. एवढेच काय मुंबईच्या चाकरमान्यांनी लुंगी ची फ्याशन खेडोपाडी नेली होती! जशी डोळ्यांची साथ येते आणि निघून जाते (ती पण एकदा मोठ्या प्रमाणावर मुंबईत आली होती) तशीच लुंगी ची साथ पण निघून गेली. शिवसेनेने " बजाव पुंगी हटाव लुंगी" अशी घोषणा देवून आंदोलन सुरु केले त्याचा परिणाम असावा कदाचित.

कोणे एके काळी ...मुंबईत... झोळी वापरायची फ्याशन आली होती. जिकडे बघावे तिकडे झोळ्या! शाळेत जाणारी मुले घेतली झोळी चालले शाळेत. कोलेज ला जाणारे पण झोळी वाले - भिकारी की विद्यार्थी ह्यातला फरक कळत नसे. ऑफिस ला जाणारे पण झोळी वापरत असत. फक्त कवींची मक्तेदारी असणारी झोळी सर्वांची मालमत्ता झाली होती त्या काळी! झोळ्यांचे पण विविध प्रकार होते. साध्या झोळ्या - झालर वाल्या झोळ्या, फुले लावलेल्या झोळ्या, नक्षी काम केलेल्या झोळ्या - झोळ्यांची फ्याशन पण काळाच्या उदरात गडप झाली.


कोणे एके काळी ...मुंबईत सिनेमागृहात पिक्चर २५-२५ आठवडे चालत असे. तिकिटांचे बुकिंग केले जात असे. लोक तासोन तास रांगेत उभे रहात असत. शेवटचा उपाय म्हणजे काळा बाजारात तिकीट खरेदी केले जात असे. त्यावरून मारामारी होत असे - खून खराबा होत असे. चांगले जुने पिक्चर्स स्वस्तात matinee ला लागत असत. कोलेज कुमार हमखास हे शो पहायला पडीक असत. बुर्हापुराण वाला  त्या काळी पिक्चर च्या गाण्यांची  हातात मावतील एवढी phamplet विकत असे आणि ती विकली पण जात असत.  चांगली नाटके होती - नाटक कार होते. काही लोकांसाठी मटका होता. रतन खत्री मटका किंग होता. अनपढ माणसे पण मटका लावताना कशी कोण जाणे पण फटाफट क्याल्कुलेशन करत असत. एरवी एखादे गणित विचारले तर ह्याना येत नसे - त्यांची माती गुंग होत असे..पण आकडा लावण्यासाठी कागदाच्या छोट्या तुकड्यावर मोठी आकडेमोड मात्र हीच लोक पटापट करू शकत असत! विशिष्ट वर्गा साठी म्हणे कुलाबा आणि चर्च गेट एरिया मध्ये क्याब्रे बार होते म्हणे.

कोणे एके काळी ...मुंबईत... मुलांसाठी मैदाने होती - बाग बगीचे होते. त्या वेळी रस्त्यावर माकड खेळ करणारे डोंबारी येत असत. डोंबारी लोकांचे रविवारी खास खेळ असायचे - दोरीवरून चालणे, तान्ह्या मुलांना काठीच्या टोकावर ठेवून हातावर, हनुवटीवर तोलणे, कुत्र्याला आगीतून उडी मारायला लावणे, दहा वर्षाच्या मुलाला पेटीत कोंबणे - अदृश्य  करणे. असे खेळ चालत. दरवेशी अस्वल घेवून येत. अस्वलांचा उडया मारण्या चा खेळ दाखवत आणि अस्वलाचा केस ताईता मध्ये बांधून देण्याचा धंदा करत. अस्वलाच्या केसाने भूत प्रेताची बाधा होत नाही अशी समजूत होती! काही लोक सिनेमा घेवून येत. पाच पैसे देवून काचेच्या होल मधून चित्रे दाखवण्याचा सिनेमा! त्याचे पण जबरदस्त आकर्षण असायचे. रात्री थकलेल्या चाकरमान्यांचे श्रम हलके करण्यासाठी रंगीत तेलांच्या बाटल्या घेवून मालिशवाले फिरायाचे आणि चंपी तेल मालिश करून द्यायचे. दुपारच्या वेळी कान कोरणारे आणि त्याचबरोबर अत्तराचा धंदा करणारे मुंबईकरांची सेवा करत असत. मनोरंजनाची आणि टाईम पास करण्याची ही  त्या वेळची काही साधने होती ती ही अशी होती.

त्या कालचे महत्त्वाचे मनोरंजनाचे साधन म्हणजे रेडिओ. त्याकाळचे लाकडी फ्रेम मध्ये बसवलेले रेडिओ दोन  दोन  माणसांना उचलत नसत. रेडिओ ऑन केला की आवाज ऐकू यायला दोन मिनिटे लागायची. वाल्व चे रेडिओ असायचे - गरम होण्यास वेळ लागायचा. हिरव्या रंगाचा magic eye  असायचा - स्टेशन लागल्यावर पूर्ण हिरवा व्हायचा. क्रॉस च्या आकाराच्या एरीअल असायच्या. रडिओ वापरण्यासाठी लायसन्स लागायचे. सरकारी अधिकारी ते लायसन्स बघायला - चेक करायला यायचे. लायसन्सची फी भरली की नाही ते चेक करायचे. जणू काही वापरणारा सामान्य माणूस घरून स्वताचे रेडिओ स्टेशन चालवणार आहे. एको - मर्फी हे प्रसिद्ध त्यावेळचे ब्रांड. मुंबई ब केंद्रावरचे प्रसिद्ध कार्यक्रम म्हणजे : पुन्हा प्रपंच (टेकाडे भावोजी  - मीनावहीनी) , मुलांसाठी गम्मत जम्मत, कामगार सभा, आपली आवड, श्रुतिका इत्यादि. पुढे काही दिवसांनी सॉलिड स्टेट तंत्रन्यान आले - transistor आले - रेडिओ चा आकार गळ्यात घालण्या इतका छोटा झाला. लायसन्स रद्द झाले. झोपड्यांमध्ये पण transistor आले. चाकरमानी ते आणि क्यामेरा गळ्यात घालून गावी जाताना मिरवताना दिसू लागले. आग्फा चे क्यामेरे त्यावेळी प्रसिद्ध होते. पुढे ७१-७२ साली टी वी आले. त्यावेळी मुंबईचा टीवी टॉवर एक प्रेक्षणीय स्थळ झाले होते. त्या टॉवर ची उंची पहाता डोक्यावरची टोपी खाली पडत असे. गांधी जयंती ला कृष्ण धवल दूरदर्शन सुरू झाले. सायंकाळी ७ ते १० असा वेळ असायचा. बातम्या, छायागीत, आणि सिनेमे हे त्यावेळचे आकर्षणे होती. Telerad, Televista, EC, Crown, Standard, Weston, Nikky Taashaa असे टीवी ब्रांड बाजारात उपलब्ध होते. त्यावेळी वाऱ्या वरची वरात , दिवा जळू दे सारी रात, बटाट्याची चाळ असे सुंदर मराठी कार्यक्रम त्यावेळी प्रेक्षकाना दाखवले गेले. पुढे हम लोग, ये जो ही जिंदगी, रजनी, रामायण - महाभारत अशा सिरीयल दूरदर्शन गाजवून गेल्या.

मुलाना खाण्यासाठी त्याकाळी विविध प्रकार उपलब्ध होते. गुळाचे चिकट, ओठ रंगवायची लाली, आईस क्यांडी, बर्फाचे गोळे आणि त्यावर टाकायचे वेगवेगळे रंग, गोल थंड गोळे, चणे, भेल, शेंगदाणे, चना दाल, कुरमुरे, चिक्की, रावळगाव, लेमन च्या गोळ्या, पेपर मिंट च्या गोळ्या. त्यावेळी जॉय आईस क्रीम खूप फेमस होते. आईस क्रीम फक्त पिक्चर ला गेल्यावर - ते पण मोठ्यांची कृपा दृष्टी असेल तरच. cadbury केंव्हातरी - बर्फी हलवा पगाराच्या दिवशी. त्या काळी बिस्कीट चे पुड्यांचे पण स्पेशल प्याकिंग असायचे - आत निदान दोन कार्डबोर्ड चे थर असायचे. साठे, पार्ले आणि ब्रिटानिया हे प्रसिद्ध ब्रांड होते. नकली बिस्किटे मिळायची - ती माती सारखी लागायची - फेकून दिली जायची - भिकार्याना दिलेल्या भाकर्या - चापात्यांपासून ती बनवतात अशी अफवा ही त्या काळी पसरलेली होती.

कोणे एके काळी ...मुंबईत... मुलांसाठी मैदाने होती आणि मुले तेथे खेळत असत. कबड्डी, उभा खो खो, बैठा खो खो, डब्बा ऐस पैस, लगोरी, पकडा पकडी, चोर पोलीस, गोटया (राजा-राणी, कोयबा, कान घाशी), क्रिकेट, गोल लोखंडी - छत्रीची तार लावून चालवायच्या गाड्या, सायकली चालवण्याच्या स्पर्धा, विटी दांडू, पतंग उडवणे  किती तरी खेळ खेळले जायचे. कटलेले पतंग पकडण्यासाठी बेभान धावणारे गच्ची वरून पडलेले, रुळावरून धावताना गाडी खाली सापडलेले अशा अनेक भयावह बातम्या पेपर मध्ये वाचलेल्या आठवतात. बदामी मांजा, गुलाबी मांजा, घासलेती मांजा आणि त्यासाठी लागणार्या फिरक्या. पतंग बदवणारा, उडवणारा आणि त्याला साथ देण्यासाठी फिरकी पकडणारा आणि मांजा गुंडाळणारा असा पतंग उडवण्यासाठी चा जामानिजा असे.  "कणी कापणे", फिरक्या घेणे" , "लपेटणे" हे वाक्प्रचार पतंगाच्या खेळातून साहित्यात आले असावेत.  लागले-पडले तर माती नाही तर लाल औषध लावले जायचे. मार दिला - मार घेतला जायचा. जिंकणे - हरण्या वरून मित्रांची मारामारी व्हायची - ती मिटवली जायची - पुन्हा दुसर्या दिवशी तोच खेळ, तीच स्पर्धा, तीच बोंबाबोंब आणि तीच मारामारी. क्रिकेट मध्ये मर्यादित षटकांचे सामने असायचे. प्रसंगानुसार त्याचे नियम बदलले जायचे. आजच्या IPL ची बीजे त्यावेळच्या आमच्या क्रिकेट च्या खेळामध्ये सामावलेली आहेत. पुढे क्रिकेट चे वर्चस्व एवढे वाढले कि मिळाली जागा - खेळ क्रिकेट अशी परिस्थिती आली. व्हरांडे - बाल्कनी मध्ये पण क्रिकेट खेळ ले जावू लागले. हे झाले मैदानी खेळ. बैठे खेळ - क्यारम, पत्ते (रमी, तीन पत्ते, पाच तीन दोन, मेंढी कोट), चेस, साप शिडी इत्यादी. लेझीम नावाचा एक प्रकार होता. त्यामध्ये पण सर्व अंगाचा व्यायाम होत असे. लाठ्या काठ्या हा स्वता: च्या सुरक्षिततेसाठी फार चांगला खेळ होता. त्या वेळी डबल बार खूपशा मैदानामध्ये असे. त्यावर दंडाचे व्यायाम केले जात. मल्लखांब करणारे लवचिक अंगकाठी कमवत असत. आज लेझीम, मल्लखांब, डबल बार antique म्हणून म्युझिअम मध्ये पण बघायला मिळतील की नाही याची शंका आहे.

कोणे एकी काळी मुंबईत शाळेच्या पिकनिक राणीचा बाग, तानसा तलाव, आरे ची दूध डेअरी, पवई तलाव, वज्रेश्वरी, मानखुर्दच्या आसपास असणारी मिठागरे अशा ठिकाणी जायच्या. हि ठिकाणे पण त्याकाळी दूर दूर वाटायची. आज हि सर्व मुंबईचा हिस्सा आहेत. त्या काळी मुंबई छोटी होती, सुंदर होती, स्वच्छ होती. हिरवी होती. आज बकाल झाली आहे. त्याकाळी सर्व प्रदेशातले लोक इथे गुण्या गोविंदाने नांदत होते. भैया, सिंधी, मद्रासी, मल्लू, तेलगु, पंजाबी, बंगाली, आसामी, गुजराथी, मुस्लीम   - सगळे आपापली संस्कृती जपून एकत्र रहात होते. मराठी - अमराठी असा वाद न्हवता. राजकारणी खाबू झाले न्हवते. कधीही कुठेही सहज बिनघोर जाता येत असे. स्फोट होईल अशी टांगती तलवार नसायची. ट्राफिक कमी होता. गाड्या असण्याचा माज न्हवता. मुंबई आपली वाटायची - आज ती बकाल झाली आहे. लोकसंख्या बेसुमार वाढली. झोपडपट्ट्या वाढल्या आहेत. फ्लाय ओवर झाले आहेत - एके काळी सरावाने वावरलेल्या जुन्या माणसाला इथे आता बावरून जायला होते. एखादा जुना बालपणीचा मित्र खूप दिवसांनी - म्हणजे मोठेपणी भेटावा आणि त्या भेटीत ती जुनी पूर्वीची ओढ येण्या ऐवजी अलिप्त पणा यावा तसे वाटते. प्रत्येकाला मुंबईत यायचे आहे. प्रत्येकाला मुंबई हवी आहे. आज मुंबई राजकारण्यांची, स्मगलारांची, बिल्डरांची, धनिकांची बटिक वाटते - परकी वाटते - कोण्या एके काळी मुंबई अशी होती ही कल्पनेतली कथा वाटते.

प्रकाश सावंत 

3 comments:

  1. Wht soever has been described is Utterly true as I was also part of it.Very Very Nostalgic,indeed! Memory just flew back the lane. Those simple, beautiful childhood days.Really,shall miss it always! Now bygone is bygone. I m really falling short of words to express it but the writer has explicitly done it. Million of tnx to him.

    ReplyDelete
  2. अप्रतिम आठवणी🙏

    ReplyDelete