Friday, 30 March 2012

यंत्रयुग

यंत्रयुग आणि आधुनिकीकरण आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. ह्याबद्दल आमचा एक दिवस अड्डा जमला होता त्यावेळी बरीच चर्चा झाली.

पूर्वी घरोघरी विहिरी होत्या. गावागावात होत्या. मुंबई मध्ये होत्या. पुण्यात वाड्यांमध्ये होत्या. विहिरीतून पाणी काढताना जबरदस्त व्यायाम होत असे. आज विहिरी असतील तर त्यावर पंप लावले गेले. बोरवेल काढल्या गेल्या. पाणी भरताना करावी लागणारी मेहनत संपली. शहरामध्ये घरोघरी नळ आले. त्यामानाने अजून बर्याच ठिकाणी विहिरी अस्तित्वात आहेत आणि "नाईलाज को क्या इलाज" म्हणून काही लोकांना त्या वापराव्या लागत आहेत. बऱ्याच लोकनी आता विहिरींवर पंप बसवले आहेत.

एके काळी जाते दळण्यासाठी वापरले जात असे. कमीत कमी एक तास जात्यावर मेहनत केली की पीठ निघत असे. त्यानंतर गल्लोगल्ली पिठाच्या गिरण्या आल्या. घरातली जाती केंव्हा दिसेनाशी झाली कळलेच नाही. मध्यंतरी घरात गहू दळण्यासाठी छोट्या गिरण्या आल्या होत्या व अजूनही आहेत. त्या फारशा प्रसिद्ध झाल्या नाहीत - कदाचित शेजारी अथवा खाली रहाणारे शेजार् च्या लोकांनी तक्रार करून उबग आणला असेल. आता तर पिठाच्या गिरण्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रेडीमेड आटा आता वाण्याच्या दुकानात मिळू लागला आहे. पुढ्या पिढीला पिठाच्या गिरण्या होत्या आणि त्यावर लोक गहू घेवून दालायाला जात होते हे सांगितले तर विश्वास बसणार नाही.  आता पिठाच्या गिरण्यांचे फोटो काढून ठेवायला हवेत.

दळप गेले - कांडप पण गेले. गावच्या घरात उखळ असे. त्यात मुसळ घालून हाताने कांडप केले जात असे. शहरात रहाणाऱ्या मुलांना जाते आणि उखळ सिनेमा किंवा विडीयो मध्ये दाखवावे लागेल. प्रत्येक घरात असणारा पाटा आणि वरवंटा किंवा रगडा पण आता इतिहास जमा होण्याची वेळ आलेली आहे. जाते, उखळ, पाटा, वरवंटा ह्यांची रवानगी  आता मागल्या दारी किंवा परसदारी झालेली दिसते. मिक्सर आता गावोगावी दिसू लागले आहेत.

धुणी धुण्यासाठी कोसभर लांब नदी वर जावे लागत असे. तिथे दगडावर आपटून व रगडून कपडे धुवावे लागत असत. कपड्यातले पाणी काढण्यासाठी ते जबरदस्त पिळावे लागत असत आणि मग घरी आणून सुकण्यासाठी दोरीवर टाकावे लागत असत. आता वाशिंग मशीन ने हे सर्व श्रम संपवून टाकले आहेत.

किचन चा ओटा नावाचा प्रकार पूर्वी न्हवताच मुळी. चुली अथवा स्टोव असायाचा. चूल असेल तर ती पेटवण्यासाठी फुंकणी फुकून गाल दुखू लागत असत. चूल खाली - डबे वरती - अशी सारखी उठ बस करावी लागत असे. आता ओटे आले. ग्यास आले. उभ राहून स्वयंपाक करायची पद्धत आली.

शेतात नांगर चालवणे, मोट ओढणे, जमीन करणे, जमीन चोपणे व सपाट करणे, पेरणी करणे अशी अनेक कामे श्रमाची होती. अजून ही होत असतील. पण आता यंत्रांचा वापर शेती मध्ये सुरु झाला.

आज गावामध्ये सुट्टीत गेले की आपण ह्या यंत्रांच्या किती स्वाधीन झालो आहोत ह्याची जाणीव लाईट गेल्यावर होते! पंखे बंद, मिक्सर बंद, गिझर बंद, दूरदर्शन बंद, आकाशवाणी बंद, पिठाची गिरणी बंद, मोटार व बाईक रीपारिंग बंद, सायकल मध्ये हवा भरणाऱ्या  अन्नाचे दुकान  बंद, घरात पाणी बंद.

गावात असे तर शहरात काय? रेल्वे बंद. कंपन्या बंद. उत्पादन बंद. ट्राम बंद. प्रेस बंद. जीवन ठप्प.

मग आठवते आपण पूर्वी कसे दिवस काढले? आपल्या पूर्वजांनी कसे सारे जमवून नेले ? हा सवयीचा परिणाम?  कधी कधी असे वाटते की ही यंत्र म्हणतील कि " आम्ही कोण म्हणूनि काय पुसता दांताड वेंगाडुनी?" किंवा "आम्हाला वगळा हतप्रभ झणी होतील यान्त्रांगणे - आम्हाला वगळा होईल कवडीमोल तुमचे जिणे किंवा होईल कष्टाचे तुमचे जिणे  "

इति श्री यंत्र युग पुराण समाप्त

प्रकाश सावंत

Sunday, 25 March 2012

Wrist Watches - Then and Now

त्या दिवशी मी शांघाई वरून परतत होतो. विमानामध्ये in-house shopping ची गाडी घेवून हवाई सुंदरी फिरत होती. त्यात मी ट्रेसा कंपनी चे घड्याळ पाहिले आणि मन भूतकाळात गेले.

१९६५ ते १९७५ चे दशक. त्या काळी मला आठवतात ती घरात वडिलांकडे - काकांकडे असणारी चावी ची घड्याळे. Henri Sandoz, Favar Luba कंपनीची. त्या वेळचे हे फेमस ब्रान्ड! त्याच दरम्यान TRESSA brand असल्याचे आठवते - ह्या कंपनीचे अंडा डायल असलेले घड्याळ माझ्याकडे होते. ते मी शाळेत घालून जात असे.

चावी रोज द्यावी लागायची ह्या घड्याळांना - नाहीतर दुसऱ्या दिवशी बंद! अरे - चावी द्यायला विसरलो वाटते रात्री - हा मग नेहमीचा dialogue. अलार्म च्या घड्यालाना पण चावी द्यावी लागायाची - नाहीतर सकाळचा उठायचा कार्यक्रम ओम फस्स. आमच्या घरी गांधीजी वापरायचे तसले रोमन अंक असलेले - कमरेला लावायाचे घड्याळ असलेले अजून आठवते. आमचा एक मित्र म्हणायचा की एकदा चावी दिली की ती उलटी फिरत असते. पुरावा म्हणून आम्ही फौंटन पेन ची शाई घड्याळाच्या चावीच्या खाचीत घालायचो आणी तो शाईचा टिपका उलटा फिरला की आमच्या मित्राची थियरी सिद्ध होत असे.

दुकानांमध्ये लंबकाची घड्याळे असायची - घरात भिंतीवर लावायची - लंबक नसलेली पण असायची - पण त्यांना रोज चावी द्यावी लागायची - चावी घड्याळाच्या खोक्यात ठेवायची सोय असायची.  त्यावेळी imported brand जास्त फेमस होते. CAMY हा एक local brand आठवतो. त्यावेळी घड्याळ असणे एक प्रतिष्टा असणारी बाब होती. लग्न असले की सासरे बुवांकडून हमखास घड्याळ भेट म्हणून मिळायचे. परीक्षा चांगल्या मार्कानी पास झाले की आई - बाबा - काका - मामा कडून घड्याळ भेट मिळणे म्हणजे एक मिरवायची गोष्ट होती. त्यावेळी घड्याळे मनगटावर घट्ट बांधायची प्रथा होती. त्या पट्ट्यात बसची तिकीटे सुरळी करून ठेवायची पध्धत होती. TC आल्यावर पटकन तिकीट मिळावे त्याची हि एक सोय होती. त्यावेळच्या घडयाळा मध्ये jewel movement असायाची - जेवढे ज्वेल जास्त तेवढी घड्याळे जास्त प्रिसाईज व महाग. रेडियम असलेल्या घड्यांची ऐट काही विचारू नका. एखाद्याच्या घड्याळात रेडियम असेल तर कृत्रिम अंधार करून चमकणारे नंबर आणी काटे पहायची आमची धडपड अजून ही आठवते

अशी घड्याळे होती त्यामुळे घड्याळ दुरुस्त करणारे घड्यालजी पण होते. त्यांची दुकाने मोठी पण होती आणि छोटे टपरीवजा पण होती. त्यात वेगवेगळे द्रव भरलेल्या बाटल्या असायचा. त्या द्रावांचा विशिष्ट वास नाकात भरायचा. घड्यालजी  च्या डोळ्याला छोटी दुर्बीण लावलेली असायची आणि ती लावून तो घड्याळ दुरुस्त करत बसलेला असायचा. ती घड्याळे गेली आणि घड्यालाजींची जमात नामशेष झाली.

त्या काळी एखाद्याचे घड्याळ जुने झाले की म्हणायाचे " चुन्याची डबी बदलून टाक" - प्लास्टिक चा जमाना येण्याच्या आधी स्टील ची घड्याळाच्या आकाराची डबी चुण्यासाठी किंवा तपकीर ठेवायाला वापरली जात असे. वेळ बरोबर न दाखवणाऱ्या घड्याळाला चुन्याची डबी म्हणत त्यात नवल काय?

घड्याळा विषयी गणितात प्रश्न यायाचे - " लंबक असलेली घड्याळे उन्हाळ्यात पुढे का जातात आणि थंडीत मागे का पडतात?" किंवा "एखादे दिवशी चावी न दिल्यास घड्याळ बंद का पडते?" - गतीज आणी स्थिथीज उर्जे चा हवाला देवून त्याचे उत्तर द्यावे लागत असे!

Swiss घड्याळांची मोनोपोली ७० च्या दशकात - जपानी घड्याळे आल्या वर संपुष्टात आली. पूवी फक्त तारीख असणारी घड्याळे होती. जपान्यांनी तारीख आणि वार असणारी आणली. त्यांची घड्याळे automatic होती. चावी न देण्याची नवलाई त्या घड्याळांमध्ये होती. सेल वर चालणारी होती. फक्त हाताच्या movement वर चालणारी होती!  CASIO, RICHO, SEIKO अशी घड्याळे बाजारात आली. ढिला पट्टा बांधायची fashion  आली.  चावी देण्याची घड्याळे नामशेष झाली. नंतर electricity वर चालणारी घड्याळे आली. पण त्यात एक प्रोब्लेम असायचा. लाईट गेली कि घड्याळ बंद! voltage च्या क्षमते प्रमाणे ती पुढे - मागे व्हायची आणि परत परत सारखी वेळ लावावी लागायची. काळाच्या ओघात चावी वर चालणारी - लाईट वर चालणारी घड्याळे दिसेनाशी झाली. आता सेल वर चालणारी घड्याळे आली - जी एकदा सेल घातला की निदान दोन महिने तरी चालतात. सेल जाईल तेव्हा - नवीन सेल टाकायचा आणि वेळ लावायची. आजच्या पिढीला चावीची किंवा लाईट वर चालणारी घड्याळे होती ही एक सुरस गोष्ट वाटेल. आज इको घड्याळे आली. किंबहुना आता मोबाईल आल्यापासून घड्याळे वापरणारे कमी झालेत.

तसेच आता महागडी घड्याळे वापरणारे कॉर्पोरेट लोक निर्माण झाले आहेत. स्कुबा डायविंग करणारे वेगळी घड्याळे वापरू लागले आहेत. नवीन ब्रांड आले आहेत. Fossils, Tissot, Swatch, असे नवे नवे ब्रांड बाजारात दिसू लागले आहेत. येरे गबाळे पण आता घड्याळे बनवू लागले आहेत. स्टेशनरी विकणारा, कापड चोपड विकणारा पण आता नवीन वर्षाचे गिफ्ट म्हणून आपल्या दुकानाचे नाव टाकून घड्याळ देवू लागला आहे. तुमचा - तुमच्या कुटुंबाचा फोटो असणारी घड्याळे आता मिळू लागली आहेत. आता घड्याळे कॉमन झाली आहेत. त्यांचे स्पेशल असणे संपले आहे.

नुसते डावे मनगट वर करून त्यावर उजव्या हाताच्या बोटाने खूण करून मान हलवली तरी समोरच्याला कळायचे की हा माणूस टाईम विचारतो आहे. आज हि गोष्ट एवढी कॉमन राहिली नाही. येणाऱ्या पुढच्या काळात मनगटी घड्याळांची उपयुक्तता रहाणार की नाही - त्याचे उत्तर येणारा कालच  देईल.

विमानात Tressa कंपनीचे घड्याळ बघून मला हे सर्व रामायण आठवले आणी ते मी इथे लिहून काढले. आशा आहे कि तुम्हाला पण flash back मध्ये घेवून जाण्यात मी यशस्वी झालो असेन.

प्रकाश सावंत