Thursday, 14 September 2023

मुंबई ची डबल डेकर

 मुंबईत डबल डेकर बस बंद होणार अशी बातमी वाचण्यात आली. ८६ वर्षापूर्वी म्हणजे १९३७-३८ च्या दरम्यान जेव्हा डबल डेकर सुरु झाली असेल त्यावेळी तिचे काय अप्रूप असेल ? आम्ही लहान असतांना पण डबल डेकर चे खूप आकर्षण वाटायचे. बऱ्याचदा मोठ्या माणसांबरोबर डबल डेकर मध्ये बसायचा योग्य आला पण तो खालच्या डेकवर- ही मोठी माणसे वर का चढत नाहीत नाहीत बसच्या वरच्या मजल्यावर अशी खंत वाटायची आणि त्यांचा रागही यायचा. एकदा हा योग्य आला. खालचा डेक भरलेला असल्याने कंडक्टर वर जा वर जा असे ओरडत होता त्यामुळे वरच्या मजल्यावर जायचा चान्स एकदाचा मिळाला. वरचा मजला हवेशीर वाटला. वरून खाली पाहायला मजा वाटत होती. ड्रायव्हर च्या वर तर सीट्स होत्या. अरे वरच्या मजल्याचा ड्रायव्हर कुठे गेला असे मी विचारलेले आठवते. त्याबरोबर बाजूच्या सीटवर बसलेली माणसे का हसली ते मला कळले नाही पण माझ्या डोक्यावर काकांनी टपली मारली- म्हणाले ड्रायव्हर खालीच असतो. पण त्यावेळी बालमनाला वर ड्रॉयव्हर का नाही हा त्यावेळी पडलेला मोठा प्रश्न अजूनही मला आठवतो. त्यानंतर थोडे मोठा झाल्यावर शाळेत जाताना मी एकट्याने प्रवास करू लागलो. त्यावेळी मी वरच्या मजल्यावर बसायलाच प्राधान्य द्यायचो. वरच्या मजल्यावर आवडीची सीट म्हणजे ड्रायव्हर च्या वरची सीट. तेथे बसून समोरून येणारी हवा खात समोर दिसणारी दृश्य पाहात प्रवास करायला मजा यायची. शाळेतील मित्र जर वरच्या सीटवर बसले तर मग वेगळोच धमाल. एखादा मस्तीखोर तर हॅन्डल फिरवून नंबर बदलायचा किंवा प्रवास दर्शक फिरवायचा. नंबर बदलला तर वरून पुढच्या स्टॉप वर चढणाऱ्या प्रवाशांचा बसकडे (भलताच नंबर दिसल्याने) बघताना होणार गोंधळ बघून एक वेगळीच फीलिंग यायची. मग आमच्यातला एखादा दोन तीन स्टॉप गेल्यावर परत हॅन्डल फिरवून मूळ नंबर आणून ठेवायचा. डबल डेकर मध्ये खाली बसायचे असेल तर माझी आवडती सीट होती बस मध्ये चढल्यावर डावीकडे आणणारी आडवी सीट. ह्या सीट च्या खिडकी कडे बसायचे आणि गर्दी नसेल तर बस च्या मागे पळणारा रस्ता पहात राहायचा. ह्या सीट वर चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या माणसांच्या असंख्य व्यक्तिरेखा बघायला मिळायच्या. रांगेतुन येऊन चढणारे, काही शेवटच्या क्षणी उडी मारून पकडणारे, सिग्नल ला बस थांबल्यावर चढण्याचा चान्स घेणारे, काही सिग्नल ला चढल्याचे कंडक्टर च्या ध्यानात आल्यावर अपमानित करून उतरवले जाणारे, कुटुंबकबिल्यासोबत चढण्याची धडपड करणारे, घुसखोरी करून चढणारे टगे, प्रवाशांची आपसातली भांडणे, प्रवाशांची कंडक्टर बरोबरची भांडणे, बस रिकामी असूनही जिन्या जवळच्या हॅन्डल ला पकडून बस च्या फुटबोर्ड वर उभे राहून प्रवास करणारे, प्रवाशांची आपसातली सामान- भाजी- लगेज घेऊन ते दरवाज्या जवळच्या सामानाच्या पिंजऱ्यात ठेऊन प्रवास करणारे (त्यावेळी बसमध्ये सामान ठेवण्यासाठी पिंजरे असायचे आणि अधिकृत पणे सामान नेता यायचे- पुढे हे पिंजरे बंद केले आणि नुसती मोकळी जागा ठेवली गेली), दरवाजात चढून तेथेच उभे राहून दोन स्टॉप गेल्यावर तिकीट न काढता उतरणारे  फुकटे ... असे किती तरी अनुभव डबल डेकर च्या बस ने दिले ... 

वरच्या आणि खालच्या कंडक्टर  चे वेगळेच को-ऑर्डिनेशन असायचे. वरून उतरणारे बरेच पॅसेंजर्स असतील तर वरचा कंडक्टर सिंगल बेल मारायचा आणि पँसेंजर्स जिना उतरून खाली गेले कि डबल बेल मारायचा. वरच्या आणि खालच्या कंडक्टर चे जर जमत नसेल किंवा पटत नसेल तर हा ताळमेळ विस्कटून जायचा. सहसा वरच्या मजल्यावर स्टँडिंग प्रवाशी ठेवायला अनुमती न्हवती पण खूप गर्दी असेल तर मात्र वरच्या मजल्यावर उभे प्रवाशी घेतले जायचे. 


आज डबल डेकर बंद होणार ही बातमी वाचल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. डबल डेकर मुंबई ची शान होती, मुंबई ची एल वेगळी ओळख होती.. आता ती मिटली जाणार हे ऐकून आपल्या आयुष्यातील एक वेगळे पर्व संपल्यासारखी जाणीव होतेय हे तेवढेच खरे ... 

Prakash Sawant

14 Sep 2023

Thursday, 2 March 2023

रेडिओ दिनाच्या निमित्ताने

रेडिओ एके काळी सर्वांच्या जीवनाचा - मनोरंजनाचा अविभाज्य भाग होता.  त्याकाळी रेडिओ वाल्व चे होते त्यामुळे त्यांचा आकार मोठा असायांचा. बहुतेक घरात रेडिओ उंचावर कपाटावर अथवा भिंतीवर फळी मारून (लहान मुलांनी हात लावू नये म्हणून) वर ठेवलेला असायचा. रेडिओ ला शोभा यावी म्हणून खास वेलवेट चे कापड बाहेरून लावलेले असायचे. रेडिओ चार बँड चा असायचा - काटा फिरवून  स्टेशन ट्यून झाले की नाही ते कळण्यासाठी एका काचेच्या गॅप मध्ये “हिरवा दिवा" असायचा - दोन हिरवे बँड एकत्र झाले की स्टेशन लागले ह्याची खातरजमा व्हायची. रेडिओ सुरु केल्यावर दोन ते पाच मिनिटांनी लागायचा. वाल्व गरम व्हायला वेळ लागायचा. पुढे डायोड आले. रेडिओ चा आकार कमी झाला. गळ्यात घालायचे ट्रांझिस्टर आले आणि नंतर खिशात घेऊन जायचे पॉकेट रेडिओ आले. रेडिओ चे कार्यक्रम वर्तमानपत्रात दिले जायचे. रेडिओ टाइम वर लोकांच्या वेळा लावल्या जायच्या. रेडिओवर दिली गेलेली बातमी ऑथेंटिक समजली जायची. एखाद्याचा रेडिओ वर कार्यक्रम असला की त्याची कॉलर एकदम कडक होऊन जायची. 


मराठी कार्यक्रमांमध्ये: पहाटेची भक्ती गीते (त्यात ‘माटी कहे कुम्हार से’हे गाणे हमखास असायचे), पुन्हा प्रपंच (ज्यात तत्कालीन घडामोडींवर भाष्य असायचे), कामगार सभा (विशेषतः शनिवारी लोकगीते आमी कोळीगीते लागायची), लहान मुलांसाठी गम्मत जम्मत कार्यक्रम, रात्री श्रुतिका, आपली आवड (ह्यात आपण सांगितलेले गाणे लावतात का आणि आपले नाव घेतात का ह्याची उत्सुकता जास्त असायची). 


हिंदी कार्यक्रमांमध्ये: विविध भारती  वरील छायागीत, भुले बिसरे गीत, इनसे मिलीये आणि जयमाला हे विशेष कार्यक्रम आवडीने ऐकले जात. शनिवारी एखादी प्रसिद्ध व्यक्ती जयमाला सादर करायची - सुनील गावस्कर, अमिताभ बच्चन, करसन घावरी, धर्मेंद्र ह्यांच्या जयमाला ऐकलेल्या आठवतात. त्याकाळी व्हिडीओ नसल्याने सिनेमा प्रमोशन साठी लावले जाणारे प्रायोजित कार्यक्रम आवर्जून ऐकले जायचे. हवा महल ची विशेष ट्यून लागली की समजायचे की सव्वा नऊ वाजलेत आणि साडेनऊ पासून दहा वाजे पर्यंत प्रायोजित कार्यक्रम लागणार आहेत आणि दहा वाजता छायागीत. रविवारी  एखाद्या चित्रपटाचा साऊंड ट्रॅक लावला जायचा. जुन्या गाण्यांसाठी ऑल इंडिया रेडिओ ची उर्दू सर्व्हिस लावली जायची आणि बुधवारी बिनाका गीतमाला साठी रेडिओ सिलोन! अधून मधून अहमदाबाद बडोदा स्टेशन लावले जायचे.  क्रिकेट चालू असताना तर शाळा कॉलेज अभ्यास विसरून रेडिओला वेढा घालून बसले जायचे 


मध्यंतरी कॅसेट प्लेयर आले, सी डी प्लेयर आले, व्ही सी डी आले त्याबेली रेडिओ ची प्रसिद्धी कमी झाली. लोकांनी कार मध्ये कॅसेट / सी डी प्लेयर लावून घेतले. लोकांचे दुर्लक्ष झाले. रेडिओ विस्मृतीत जाऊन इतिहास जमा होतो की काय असे वाटायला लागले. पण पुढे एफ एम सुरु झाले. रेडिओ ने कात टाकली. कार मध्ये आता लोकं रेडिओ ऐकू लागलेत. मोबाईल मध्ये रेडिओ ट्यून केला जाऊ शकतो. वेगवेगळी रेडिओ ची ऍप  आलीत. इंटरनेट वर पण रेडिओ ट्यून करू शकतो. पूर्वीइतका पॉप्युलर नाही पण रेडिओ पुनर्जीवित झाला आहे हे ही नसे थोडके !

प्रकाश दिगंबर सावंत 

०२ मार्च २०२३ 


Sunday, 19 February 2023

मला आवडलेले पुस्तक - काळोख आणि पाणी (अरुणा ढेरे लिखित)

महाभारतात नाही ते जगांत नाही असे म्हणतात - "काळोख आणि पाणी" ह्या श्रीमती अरुणा ढेरे लिखित पुस्तकात मानवी स्वभावाचे अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत. उत्तुंग वाटणाऱ्या व्यक्तिमत्वांची पावले शेवटी मातीचीच होती हे प्रकर्षाने जाणवते. ह्या संग्रहात अनेक अशा कथा आल्या आहेत ज्या कधी ऐकल्या अथवा वाचल्या न्हवत्या. कधी तरी आजी च्या तोंडून "आज शेषाची पाळी" ची कथा ऐकलेली अंधुकशी आठवते. महाभारत, त्यातील व्यक्तिरेखा, त्यांच्या वर्तवणुकीचे विश्लेषण, त्यांच्या वर्तवणुकीची जनमानसावर पडलेली छाप आणि त्यातून जन्मलेल्या (आपण न वाचलेल्या) कथा ह्या पुस्तकात दिलेल्या आहेत ज्या आपणाला अंतर्मुख करून सोडतात. गांधारीची धृतराष्ट्र आणि दुर्योधनामध्ये होणारी कुचंबणा, धृतराष्ट्राचा अप्पलपोटेपणा, भीष्मांची स्त्रियांबद्दलची निरीच्छ वृत्ती. दुर्योधनाचा युद्धाच्या शेवटी त्याला जाणवलेला एकाकीपणा, रितेपण आणि ऐन युद्धाच्या समरप्रसंगी आलेली निरागस बालपणाची आठवण - त्यांचे कौरव पांडवांचे एकत्र खेळण्याचे चांगले दिवस त्याला आठवतात तो क्षण आपणाला पण हळवे करून सोडतो, जीवन संघर्षाचा फोलपणा जाणवून देतो. कितीतरी असे पैलू ह्यात वाचायला मिळतात. आदिमायेची रक्ताची आस, तिची द्रौपदी शी जोडलेली नाळ आणि कृष्णाच्या पायाला बाण लागून अवतारपूर्ती च्या वेळी सांडलेला रक्ताचा थेंब त्या आदिमायेच्या रक्ताची आस पूर्ण करणार आहे काय? विशेष करून "कुंतीचा नातू" ही कथा वेगळाच आशय मांडून आपणाला जीवनाचे तत्वज्ञान सांगून जाते
- प्रकाश दिगंबर सावंत 
- १० फेब्रुवारी २०२३ 

Wednesday, 16 February 2022

मोडी लिपी - एक आठवण

 लहानपणी कोकणात मे महिन्याच्या सुट्टीत गावी जायचो. त्यावेळी अगदी बारावी पास होईपर्यंत मी गावाला जायचो. ऐंशी च्या दशकापर्यंत गावाकडे लाईट न्हवती. त्यामुळे रात्री बैठे खेळ दिव्याच्या अथवा कंदिलाच्या उजेडात खेळले जायचे नाहीतर एखादे गोष्टीचे पुस्तक वाचले जायचे. नऊ च्या दरम्यान जेवण खान आटपून दहापर्यंत झोपी जायचो. गावाकडे पहिले काही दिवस नव्या नवलाई प्रमाणे आसपास फिरण्यात आणि भेटीगाठी करण्यात जायचे. मुंबई ला परते पर्यंत मधला काळ मग फडताळे शोध, पेट्या शोध, पोटमाळे शोध असे करण्यात जायचे. अशा वेळी जुने पुराणे कागदपत्रे हाती लागायची. मला आठवते जुन्या पिवळ्या पडलेल्या वह्या, खतावण्या हाती लागल्या होत्या. त्या म्हणे माझ्या आजोबांनी आणि पणजोबा – खापर पणजोबा ह्यांनी त्यांच्या अक्षरात लिहिल्या होत्या. सर्व मोडी भाषेत. फास्ट लिपी त मोडी लिहिलेले मी अंकलिपी नंतर प्रथमच पाहिले. इंग्रजी प्रमाणे कर्सिव्ह मराठी लिहिता येत होते तर. माझी आजी ते मोडी हळू हळू का होईना पण वाचू शकत होती पण तिची मुले म्हणजे माझे वडील आणि काकाना मोडी कळत न्हवते. त्या पुस्तकात वंशावळ लिहिली होती. देणे घेणे लिहून ठेवले होते, ठळक घटना लिहून ठेवल्या होत्या. पण ज्या पिढीच्या हातात हे दस्तऐवज होते (माझ्यासकट) त्यांना मोडी भाषा समजत न्हवती. मोडी लिपी केवळ एकदोन पिढ्यांमध्ये मोडीत निघाली होती. आधुनिक तथाकथित इंग्रजी शिक्षणापुढे लोकांनी मोडी कडे पाठ फिरवली आणि मोडी भाषेने मान टाकली. आज आम्ही साठी मध्ये असणाऱ्या पिढीला निदान मोडी मराठी भाषा विशिष्ट लिपी सह अस्तित्वात होती हे माहीत आहे पण आमच्या पुढच्या पिढीला कसे माहीत पडणार? दस्तऐवज बघून झाल्यावर आजी ते पुन्हा चौरंगाच्या पेटीत जपून ठेवायला सांगायची. पुन्हा ते पुढच्या वर्षी उघडायचे आणि नजरेखालून घालायचे असा प्रघातच पडला. ह्या वह्या पूर्वजांच्या होत्या, त्या त्यांनी हाताळल्या होत्या, बोरू आणि शाई ने त्यात त्यांनी मराठी मोडी भाषेत मजकूर लिहिला होता ह्या जाणिवेनेच शहारे येत असत. कधी लिहिला असेल मजकूर? ह्या घरात? मुंबईला नोकरीत असतांना ? निवृत्त झाल्यावर? का वेळ मिळेल तेंव्हा ? दिवसा की रात्री दिवा/कंदिलाच्या उजेडात लिहिला असेल? बैठकीचा मेज वापरला असेल का चौरंगाला च मेज केला असेल? बोरू घरीच बनवत असत की बाजारातून आणून ठेवले असतील? आणि शाई? शाई ची पावडर वापरली असेल की द्रव शाई? काही मजकूर शिशाच्या पेन्सिल ने लिहिलेला पण होता.

बारावी नंतर गावी जाणे झाले नाही. पुढे पदवी परीक्षा आणि मग नोकरी. त्यामुळे पूर्वी दरवर्षी गावी जाणे थांबले. पुढे आजी वारली. गाव चे घर पोरके झाले. पुढे जास्त कोणी लक्ष दिले नाही. मोडी लिपीतले ते दस्तऐवज कुठे गेले काही कळले नाही. लोकं अशा गोष्टी जपून ठेवतात. आम्हाला ते जमले नाही. लहानपणी हे दस्तऐवज पहातांना मोडी शिकायची जबरदस्त उर्मी यायची पण ते शक्य झाले नाही. त्या चौरंगाच्या बाजूला जुने ग्रंथ होते – पांडवप्रताप, हरिविजय, रामायण, भागवत वगैरे. त्यांची पारायणे चातुर्मासात अथवा नामसप्ताह सोहळ्यात केली गेली असतील. त्यांना पण माझ्या आजीने, आजोबांनी पंजोबानी हाताळले असेल. ते ग्रंथ पण सापडले नाहीत. काळाच्या ओघात घराच्या आधी ते जीर्ण होऊन अस्त पावले असतील. जुन्या मोजमापाची साधने घरात होती – पायली, शेर, खंडी, मण ह्यांची मापे घरात होती. किलो आणि ग्राम तेंव्हा वापरात न्हवते. कालप्रवाहात ही लाकडी मापे फुटून गेली असावीत. आता कोणाकडे असतील तर ती कोपऱ्यात पडलेली असतील अगदी दगडी जात्याप्रमाणे किंवा लाकडी भात भरडण्याच्या जात्या सारखे.

प्रकाश दिगंबर सावंत

१६ फेब्रुवारी २०२२ 

Thursday, 27 February 2020

गावाकडची कोळशाची मशेरी आणि काळा चहा


तीस चाळीस वर्षांपूर्वी मी पाच सहा वर्षांचा असताना कोकणात गावी जायचो त्यावेळचे दिवस वेगळेच होते. त्यावेळी मुंबईतील चाकरमानी रातराणी एस टी ने गावी जायला प्राधान्य द्यायचे कारण दैवाची कामे करून संध्याकाळी गावाकडे निघायची संध्याकाळची वेळ सोयीची असायची आणि उन्हाळ्यात रात्रीचा प्रवास गर्मी चा त्रास होऊ नये म्हणून सोयीचा पडायचा. सायंकाळी ५-६ वाजता सुटलेली गाडी सकाळी सहा - सात वाजता गावात पोचायची.

एस टी स्टॅन्ड वर उतरून घराकडे चालत जायला लागायचे. पंधरा ते वीस मिनिटे लागायची. एस टी ची सतत घरघर ऐकून गावात उतरल्यावर जाणवणारी निरव शांतता मुंबई सारख्या शहरात कधीच अनुभवलेली नसायची त्यामुळे इथे ती अंगावर यायची. त्या शांततेमुळे कुठे तरी दूर आडगावी निवांत आणि शांत ठिकाणी आल्याची जाणीव व्हायची. आमचे गाव तसे त्याकाळी अस्सल खेडेगाव होते.त्याकाळी तेथे रिक्षा न्हवत्या, गाड्या कोणाकडे क्वचित होत्या. त्यामुळे बैलगाडी हेच एकमेव वाहतुकीचे साधन होते; आणि पायी चालत जाणे हे तर जीवनाचा अविभाज्य भाग होता.  तांबड्या पायवाटेने दव पडलेल्या सुक्या गवतावरून त्याचा ओला वास घेत पायी चालत जाता जाता पक्ष्याचे आवाज, ढोरांचे हंबरणे, शेणा मुताचा वास आणि मधून येणारा काटक्या जाळण्याचा वास घेत जाताना तसेच शेतात कामाला जाणारे काही आणि लोटा घेऊन माळावर जाणारे गाववाल्यांच्या चौकशाना सामोरे जात घर कधी यायचे ते कळायचे नाही.

पांदीतून जाताना घराचे दार समोर दिसायचे. आजी स्वागताला उत्सुकतेने उभीच असायची. आम्हा छोट्या नातवंडांना बघून ती धावत पुढे यायची आणि आम्हाला मिठीत घेत तिचा खरखरीत हात आमच्या तोंडावरून फिरवत राहायची आणि आम्हाला घरात घेऊन जायची. ती एकटीच घर सांभाळायची. आम्ही घरात आल्यावर तिची लगबग सुरु व्हायची.

मग आमची पण लगबग सुरु व्हायची. हातपाय धुवून दात घांसण्यासाठी. पण त्यावेळी मुंबईमध्ये वापरली जाणारी पेस्ट किंवा दंतमंजन आणलेले नसायचे. मग आमच्यासमोर कोणीतरी गावठी दंतमंजन बनवून द्यायचा. आमच्यासमोर खापरीवर कोळसे अथवा निखाऱ्यावर शेणी जाळली  जायची, त्याची राख केली जायची. ती राख बारीक चूर्णासारखी करून मग वस्त्रगाळ करून वाडग्यात घेतली जायची आणि त्यात चिमूटभर बारीक केलेले मीठ टाकले जायचे की झाले दंतमंजन तयार -जे आमच्या हातावर ठेवले जायचे. राख - कोळसा - मीठ असलेले ते काळपट - राखाडी दंतमंजन आम्हाला त्यात कोळसा, शेण (म्हणजे गुरांची शी ! ई ) आणि राख असल्यामुळे कसे कसेच वाटायचे - अजिबात आवडायचे नाही.  पण उपाय नसल्यामुळे झाक मारत ते वापरायला लागायचे. आमचे नखरे बघून आजी सांगायची - "अरे खुळ्यांनो, शेणाच्या ह्या गावच्या घरी बनवलेल्या राखुंडीत चांगले गुणधर्म असतात आणि मीठ टाकल्यामुळे ही जंतुनाशक झालेल्या ह्या  मशेरीसमोर तुमच्या शहरातल्या पावडरी झाक मारतील." तरी आम्ही तोंड वेंगाडत राहात असू.   तोंड वेडेवाकडे करून आम्ही ते लावायचो आणि तालुक्याच्या  बाजारातून रतनज्योत किंवा कोलगेट पावडर आणून द्या म्हणून पालकांच्या मागे लागायचो. मग जेव्हा कोणी बाजाराला जाईल त्यावेळी ती पावडर आणली जायची तोपर्यंत गावठी कोळसा आणि राखुंडी व  मीठ असलेली गावठी दंतमंजन पावडर वापरायला लागायची. पुढे मुंबईवरून गावी येताना आम्ही बॅग भरताना आमची दात घासायची पावडर अथवा पेस्ट आमच्या बॅगेत न विसरता पॅक करायचो.  

आजी नंतर आम्हाला चहा करून देते म्हणून चुलीवर पातेल्यामध्ये पाण्याचे आधण ठेवायची आणि चहा बनवायच्या तयारीला लागायची. तोपर्यंत आम्ही हात पाय धुवायच्या मागे व्यस्त होऊन कपडे बदलून यायचो आई स्वयंपाक घरात चहासाठी बसायचो. आजी मग चहाचे कप पुढे करायची. त्यातला काळा कुट्ट चहा पाहून आम्ही दोन पावले मागेच सरायचो. अशा चहा पिण्याची सवय नसल्यामुळे तो आम्हाला काढ्यासारखा लागायचा.  गुळाचा, दूध नसणारा काळा चहा मुंबईत कधी प्यायलेला नसल्यामुळे ही अवस्था व्हायची. मग आजी सांगायची “गावाकडे दूध नसल्यामुळे हा चहा काळा आहे आणि त्यात गूळ टाकलेला आहे; अरे हा काळा चहा प्रकृतीला चांगला. त्यात गूळ आहे त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. असा चहा रोज प्यायला तरी ठणठणीत राहाल - कसला तो पांढऱ्या साखरेचा चहा पिता रे तुम्ही?" आम्हा मुलांना काही ते पटायचे नाही. आम्ही चहा प्यायचो नाही. नातवंडे चहा पित नाही म्हटल्यावर आजी व्यथित व्हायचो. तो कोणाकडून तरी दुधाचा रतीब (आम्ही गावी असेपर्यंत) लावायची आणि गुळाचा दूध घातलेला चहा बनवायची. तो पण प्यायला आम्ही का- कू करू लागल्यावर मग ती माझ्या वडिलांना अथवा काकाला तालुक्याच्या बाजारातून साखर आणायला लावायची आणि आम्हाला मुंबई सारखा चहा मिळू लागायचा.पण गावात ज्यांच्या ज्यांच्या घरी जायचो त्या सर्वांकडे आम्हाला काळाकुट्ट गुळाचा चहाचा काढाच मिळायचा आणि मग साक्षात्कार व्हायचा की अशी चहा प्यायची इथली "लाइफस्टायल" आहे; त्यामुळे आम्ही गावी असेपर्यंत जर कधी दूध नसले वा साखर नसली अथवा दोन्ही नसले त्यावेळी घरी बनलेला गुळाचा बिन दुधाचा चहा आम्ही गोड मानून घ्यायचो.

आज आम्ही मल्टिनॅशनल कंपन्यांची जाहिरात बघतो ज्यात त्यातली सुंदर बाई विचारते "तुमच्या दंतमंजनामध्ये मीठ आहे काय? त्यात कोळसा आहे काय?" अरे चाळीस वर्षांपूर्वी आमचे आजे-पणजे आम्हाला कोळसा आणि मीठ असलेले दंतमंजन ताजे बनून देत होते त्यावेळी कोळसा - राख दातांना वाईट, इनॅमल ची वाट लागते असे ह्या कंपन्या सांगत होत्या आणि आम्हाला भ्रमित करून आपले प्रोडक्ट्स प्रमोट करत होते. आज ह्या कंपन्यांना अचानक राखुंडी -  कोळसा - मीठ दातांच्या आरोग्यासाठी चांगले असल्याचा जावई शोध लागलाय काय? त्यांच्या टूथ पेस्ट मध्ये शरीराला अपाय करणारे फ्लोराईड आणि लौरीयल सल्फेट असल्याचे रिपोर्ट्स बाहेर येऊ लागलेत. मग आमची ती निसर्गाशी तादाम्य पावणारी दंतमंजन बनवायची प्राकृतिक पद्धत काय वाईट होती?


आज डीप डीप चहाचे फ्याड आले आहे. हर्बल आणि ग्रीन टी आरोग्याला कसा चांगला हे आपण एकमेकाला सांगत असतो. बिन दुधाचा चहा आरोग्याला चांगला म्हणून तो तसा (आणि बिन साखरेचा पण) प्यायची फॅशन अली आहे. साखर आरोग्याला घटक असल्याचे किती तरी रिपोर्ट्स आपण वाचले आहेत. साखरे ऐवजी गूळ चांगला असे पाश्चात्त्य लोक आता सांगू लागले आहेत. काळा गूळ आहारात असावा असे पण आहार तज्ञ् सांगत आहेत. रक्तातील साखर वाढू नये म्हणून, तसेच वजन वाढू नये म्हणून साखर आहारातून वागला, गूळ वापरा, ग्रीन टी प्या असे आज जे सांगत आहेत त्यांना ओरडून सांगावेसे वाटते की आपले पूर्वज, माझी आजी बिन साखरेचा गुळाचा काळा चहा देताना वेगळे काय सांगत होती?  ज्या पाश्चात्त्यांच्या औदयोगिक क्रान्तिला भुलून, त्यांच्या संशोधनाला प्रमाण मानून आपण बऱ्याच चांगल्या परंपरागत गोष्टींचा त्याग केला तेच पाश्चात्त्य आता आपल्या प्रथा, खाण्याच्या पद्धती, आयुर्वेद उपचार अंगिकारात आहेत.

आज गावे सुधारली आहेत. जग जवळ आले आहे. मुंबईत मिळणाऱ्या साऱ्या वस्तू आज गावाकडे सहजा सहजी उपलब्ध आहेत. आज चुलीची जागा गॅस ने घेतली आहे. कोलगेट ने मार्केटिंग करून गावोगावी पेस्ट आणि ब्रश उपलब्ध करून दिले आहेत. बऱ्याच घरांमध्ये आज साखरेचा चहा बनतो आणि हो दुधाचा पण - कारण पॅक केलेले दूध आज गावाकडे सर्वत्र मिळते. अशा पॅक केलेल्या दुधात पण भेसळ केली जाते. आज गावाकडे खापरीवर शेणी जाळून मशेरी करून देणारा कोणी राहिला नाही. तेवढा कोणाला वेळी नाही. आज गावाकडे काळा चहा मिळेल पण साखरेचा मिळेल, गूळ फार कमी लोक वापरतात. चाळीस पन्नास वर्षांपूर्वी कोकणातल्या आमच्या गावाकडच्या खेड्यात असलेली जीवन -पद्धती आरोग्याच्या हितासाठी किती योग्य होती ही दृष्टी थोडी उशिरा म्हणजे आज मोठे झाल्यावर, जग पाहिल्यावर, शिकले सावरल्यावर मिळाली. सगळंच जुनं वाईट नसतं आणि टाकून देण्यासारखे नसते ही जाणीव जुन्या आठवणी कुरतडत राहाते आणि काहीतरी हरवल्याच्या भावनेने जीव कासावीस होत राहातो.

- प्रकाश दिगंबर सावंत 

Tuesday, 24 January 2017

आजचे पाश्चात्त्य आणि आपली जुनी संस्कृती

आजचे पाश्चात्त्य आणि आपली जुनी संस्कृती


भारतीय संस्कृती आणि विज्ञान किती प्रगत होते. आपल्या लोकांनी ते मौखिक आणि लिखित अशा दोनी रूपात उपलब्ध करून ठेवले होते. परंतु परकीय आक्रमणांनी आपल्या सर्व ज्ञानाचा आणि साहित्याचा नाश केला. इंग्रजानी अतिशय पद्धतशीरपणे आपला इतिहास विकृत केला आणि आपल्या मूळ संस्कृतीपासून इथल्या लोकांना दूर नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले. जेव्हा युरोपात लोक गुहेत राहात होते तेव्हा आपल्याकडे बहरलेली संस्कृती होती, पुढारलेले विज्ञान होते, आपली गुरुकुल शिक्षण पद्धती होती, चार आश्रम होते. जात पात कोणी तरी नंतर घुसडली. विश्वामित्र क्षत्रिय असून तपस्वी झाला होता, लोखंडाचे सोने बनवण्यापर्यंत मजल गेली होती, पारा औषधात आणि विमाने बनवण्यात/चालवण्यात वापरला जात होता. खगोल शास्त्रीय ज्ञान अफाट होते. पंचांग तयार केले जे आज पण अचूक गती दाखवते आहे. अगस्ती आणि भृगु सारख्या मुनींनी पुढे येणाऱ्या कित्येक पिढयांची भविष्ये लिहून ठेवली (उदा. नाडी ज्योतिष), मंत्र तंत्र वापरून अस्त्रे निर्माण केली, वेगवेगळे राग - दिवे लावणारे, पाऊस पाडणारे इथेच निर्माण झाले. चरक सारख्या ऋषींनी कित्येक शल्य क्रिया केल्या. परलोक विद्या पारंगत झाले, जन्म, मृत्यू ,पुनर्जन्म,  मोक्ष ह्यासारख्या कल्पना मांडल्या. अगदी कालपर्यंत चाणक्या सारखे विद्वान इथे जन्मले आणि त्यांनी अतिशय उपयुक्त विचार प्रदान केले.   पाश्चिमात्यांनी आपणाला आपल्या मूळ ज्ञाना पासून दूर केले. आपण बहकत गेलो. पाश्चिमात्य लोक आता आपल्या पुर्वजांच्या प्रथांकडे आणि ज्ञानाकडे डोळे उघडून पाहू लागले आहेत.

गावाकडे आपण शेण अथवा गोवरी जाळून त्या राखेत मीठ टाकून दात घासत असू - त्यावेळी असल्या मंजनामुळे दाताला इजा पोचेल म्हणून टूथ पेस्ट चे मार्केटिंग केले गेले - आज त्याच कंपन्या आपल्या पेस्ट मध्ये "मीठ" आणि "कोळसा" आहे का विचारत आहेत. गावाकडे हातसडीचे तांदूळ वापरात असत, गुळाची चहा बनवत असत, पाहुणा आला कि गूळपाणी देत असत; मॉर्डन सोसायटीच्या नावाखाली आपल्याला पोलिश केलेल्या तांदळाची आणि कारखान्यात बनवलेल्या गंधक असलेल्या साखरेची सवय लावली गेली. लोणकढी तूप हृदयाला खराब म्हणून वनस्पती तूप - डालडा - उमदा खायची सवय लावली गेली आणि पुढे जेव्हा डालडा हृदयाला हानिकारक असतो आणि रक्त वाहिन्या ब्लॉक करतो हे कळल्यावर ऑलिव्ह तेल, सूर्यफूल तेल प्रमोट करण्यात आले. खोबरेल तेल (नारळा ला आपण कल्पवृक्ष म्हणतो) संपृक्त असल्याने ते पण वाईट असे सिद्ध केलेले लोक आता नारळाच्या तेलाचे गुणगान गात आहेत. मध्यंतरी हळदी (जी आपल्याकडे हळद तुरटी लेप, घसा बसला असल्यास, जखमेवर लावण्यासाठी वापरली जाते) मध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असल्याचा जावई शोध ह्यांनी लावला आणि त्याचे पेटंट घ्यायला निघाले. आपल्या लोकांनी हंगामा केला म्हणून ते झाले नाही. बासमती तांदळाचे पेटंट घेतले गेले आहे. लसूणीचे आणि कोरफडीचे गुणधर्म आता आता ह्यांच्या ध्यानात येऊ लागले आहेत. पुढे जाऊन गवती चहा आणि आल्याचे पण हे लोक पेटंट घेण्याची शक्यता आहे. रासायनिक खते सोडून तिकडे आता "ऑरगॅनिक" फार्मिंग सुरु झाले आहे. आमच्या सुपीक जमिनीचा कस रासायनिक खते वापरून आपणच संपवून टाकला.  आमचे ज्ञान चोरायचे आणि ते वापरून बनवलेले पदार्थ अवाच्या सवा दराने (पेटंट घेतल्यामुळे) परत त्याच्या देशातून आम्हालाच विकायचे किंवा फ्र्यान्चाईज द्यायच्या ! आता योग आणि प्राणायाम वर तिकडे संशोधन चालू आहे आणि केवळ प्राणायाम करून बरेच रोग आटोक्यात आणता येतात हे त्यांना कळले आहे.

सध्या जल्लीकट्टू येथे चाललेल्या बैलांच्या खेळाला विरोध केला जात आहे - तसा तो स्पेन मध्ये चाललेल्या खेळाला का केला जात नाही? "पेटा" ह्या संस्थेने का विरोध केला हे कळात नाही. त्यांचा खरोखर चांगला हेतू आहे कि अंतस्थ हेतू वेगळा आहे - कसे कळणार? माझया एका व्हेट मित्राने सांगितले कि इस्त्रायल ने भारतातून वशिंड असलेल्या हजारो भारतीय गायी त्यांच्या देशात आयात केल्या आहेत आणि त्यांची ते जाणीवपूर्वक पैदास करत आहेत. आपल्या इकडे लोक जर्सी गायीचे फ्याड डोक्यात घेऊन बसले आहेत. आता अमेरिकेत पण ह्या देशी भारतीय गायी आणि त्यांचे गोठवलेले गर्भ आयात केले जात आहेत आणि देशी गायीच्या दुधाचे पेटंट घेण्याच्या मार्गावर आहेत. आपल्या देशातून इतर गोष्टींप्रमाणे देशी गायीचे उच्चाटन करण्याचा हेतू तर ह्या मागे दडलेला नाही?

संस्कृती आणि प्रगती ह्याचा योग्य ताळमेळ घातला पाहिजे. आपले उत्सव पण आता कमी होत आहेत. दही हंडी फोडू नका, पतंग उडवू नका असे चालले आहे. प्रथा परंपरा मोडून चालल्या आहेत. आपल्या नव्या पिढीला पिझ्झा बर्गर अशा जंक फूड ची सवय लावली गेली आणि तिकडे पुन्हा बरेच लोक शाकाहारी चा उदो उदो करू लागले आहेत. आपल्याला ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे 

Sunday, 27 November 2016

चलन बदल = देश बदल?

आठ नोव्हेंबर (२०१६) ला रात्री आठ वाजता पंतप्रधान मोदींनी १००० आणि ५०० च्या चलनी  नोटा  रद्द करण्याचा धाडसी निर्णय जाहीर केला आणि देशात मोठा आर्थिक भूकंप झाला. मोदी ह्यादिवशी रात्री आठ वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण देणार होते; बर्याच लोकांना वाटले कि ते बहुतेक पाकिस्तान च्या कुरापतींवर बोलणार आणि कदाचित युद्धाच्या शक्यतेवर वक्तव्य करणार. पण त्यांनी काळ्या पैशा विरुद्ध लढाई जाहीर केली आणि बहुतेक लोक त्यांच्या ह्या घोषणेने सुन्न झाले. सामान्य माणूस सोडा पण कोणत्याही पक्षाचा नेता त्यावेळी काही दिवस प्रतिक्रिया व्यक्त करू शकला न्हवता. मात्र त्यादिवशी रात्रीच लोकांनी ए टी एम मशीन वर धाव घेऊन पैसे काढण्यासाठी पराकाष्टा केली पण नव्या नोटा त्यात न्हवत्या आणि मिळालेल्या ५००/१००० च्या जुन्या नोटा चालणार न्हवत्या. परंतु सरकारने जुन्या नोटा बदल्यनाची स्कीम आणि जुन्या नोटा ब्यांकेत भरण्याची स्कीम जाहीर केली. मी पण जुन्या नोटा बदलून घेतल्या आणि जुने चलन माझया खात्यात भरून टाकले. पुढे २ डिसेंबर पर्यंत इस्पितळे, टोल  नाके, सरकारी कार्यालये, नगरपालिका कर, फोन बिले वगैरे भरण्यासाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची व्यवस्था सरकारने केली. पण २-३ आठवडे उलटून हि लोकांना अजून नव्या ५०० - १००० च्या नोटा मिळालेल्या नाहीत. २००० च्या नोटा मिळताहेत पण त्याची चेंज कोणीच देऊ इच्चीत नाही. नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर फक्त २००० च्या नोटा बाजारात आल्या आणि ५०० -१००० च्या नोटा हव्या तेवढ्या छापल्या गेल्या नसाव्यात बहुधा.१०० च्या नोटा चलनातून गायब झाल्यासारख्या झाल्या.  नव्या २०००/५००/१००० च्या नोटांची साईझ बदलल्याने देशातील लाखो ए टी एम मशीन च्या डिस्पेंसिंग सिस्टीम बदलाव्या लागल्या आणि त्यामुळे लोकांची गैरसोय झाली. बाजारपेठ थंड झाली. लोक पैसे वापरण्यासाठी हात आखडू लागले.उपहार गृहे, मॉल ओस पडले, वाण्यांचे  व्यवहार मंदावले, फ्लिप कार्ट - अमेझॉन- स्वीग्गी ह्यांच्या ऑन लाईन ऑर्डर सिस्टीम ब्लॉक झाल्या ; पण जुन्या नोटा वापरण्याच्या सुविधेमुळे सरकारचे कर आणि इतर उत्पन्न वाढले. जे लोक वीज बिले भारत न्हवती, वर्षानुवर्षे ज्यांनी मालमत्ता कर भरला न्हवता, फोन बिले उधार ठेवली होती त्यांनी जुन्या नोटा वापरून आदर्श नागरिकांचे कर्तव्य बजावले. गृहिणींनी एवढ्या वर्षात नवर्याच्या अपरोक्ष बचत करून पिगी ब्यांक अथवा डब्यामध्ये जे पैसे साठवले होते आणि जे असे अडकून बसले होते ते बाहेर आले. सरकारने एका खात्यात अडीच लाख भरण्याची मुभा दिल्याने प्रामाणिक नागरिकांनी ते आपापल्या खात्यात भरून टाकले. मोदींनी ५० दिवसांचा अवधी मागितला आहे जनते कडे सारे काही सुरळीत करण्यासाठी आणि लोकांना पण जुन्या नोटा आपापल्या खात्यात भरण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत चा अवधी दिलेला आहे. 

मोदी सरकारने हा निर्णय का घेतला? मुख्य उद्देश काळा पैसा बाहेर काढणे आणि खोट्या नोटांचा व्यवहार (आणि पर्यायाने अतिरेक्यांचे कंबरडे मोडणे) हा होता. ह्या निर्णयावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्या लोकशाही असणाऱ्या देशात अपेक्षित आहेतच आणि त्या होणारच. पण काळा पैसा बाहेर काढण्यासाठी उचलेले पहिले पाऊल म्हणून सर्व सामान्य लोकांनी ह्या धाडसी निर्णयाचे स्वागत केले. १९७८ मध्ये मोरारजी देसाईंनी १००० च्या नोटा रद्द केल्या होत्या परंतु त्यावेळी सर्व सामान्यांना त्याची झळ अजिबात पोचली न्हवती कारण त्यावेळी त्यांच्यासाठी १०० ची नोट मोठी होती आणि ती पण क्वचित असायची एखाद्याकडे. पगार पण चार आकडी क्वचित असायचा. लोकांचे व्यवहार रोखीत जास्त असायचे आणि ब्यांकेत खाती फार थोड्या लोकांची होती. ब्यांके शी संबंध म्हणजे डी डी काढणे, चलन भरणे ह्यासारख्या गोष्टींपुरता मर्यादित होता. पगार ब्यांकेत जमा करण्याची पद्धत फार कमी होती - पगाराच्या दिवशी कामगारांना रोख रक्कम मिळत असे आणि ती घेऊन ते आपापल्या घरी जात असत. ५०-२०-१० च्या नोटा त्यावेळी वापरात होत्या. १००० च्या नोटा खूप कमी लोकांकडे होत्या त्यामुळे त्यावेळी व्यवहार अजिबात ठप्प झाले न्हवते. २०१६ मध्ये १००० आणि ५०० च्या जास्त नोटा व्यवहारात होत्या आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन ठप्प  झाले. आणि हे जीवन ५० दिवसांपेक्षा जास्त दिवस जर ठप्प  झाले तर त्याचे दूरगामी परिणाम मोदी सरकारला भोगावे लागतील. त्यामुळे हाय रिस्क असलेला मोदींचा हा निर्णय धाडसी म्हणावा लागेल. 

आपल्या देशाला लागलेल्या दोन मोठ्या किडी म्हणजे भ्रश्टाचार आणि काळा पैसा. एका परदेशी तज्ञाने म्हटले आहे कि भ्रश्टाचार हा भारतीयांच्या हाडी -मासी भिनलेला आहे. भारतात देवळामध्ये नवस बोलला जातो आणि तो पूर्ण झाला कि मग देवाला जे काही बोलले असेल त्याची लाच दिली जाते. माझे अमुक काम कर मग मी तुला तमुक देईन असे देवाला सांगितले जाते आणि आपण ते लहानपणापासून पाहात असतो. त्यामुळे सरकारी कार्यालयात एखादे काम करण्यासाठी आपल्याला लाच देण्यात काहीच वावगे वाटत नाही. उलट ते काम बिना झंझट आणि लवकर होते असे आपण खाजगीत बोलत असतो आणि पुढच्या पिढीला हे संक्रमित करत असतो. एक बाई आपल्याला नातू होऊंदे मग मी तुला त्याच्या पाचव्या वाढदिवसाला सोन्याचा वाला  देईन असा नवस बोलते आणि नातू झाल्यावर त्याला पाच वर्षांनी जेव्हा देवळात घेऊन नवस फेडायला जाते तेव्हा नातवाच्या पायातला कथलाचा  वाळा देवाला अर्पण करते तेव्हा देव प्रकट होतो आणि रागावून विचारतो " हे काय? तू सोन्याचा वाळा देणार होतीस ना? कथलाचा काय देतेस?" तेव्हा ती बाई म्हणते " देवा माझया नातवाचे नाव सोन्या ठेवले आहे आणि मी त्या सोन्याचाच वाळा तुला देत आहे" आपल्याकडे हे असेच आहे. आपण कर चुकवतो, ऍडमिशन साठी डोनेशन देतो, कॅपिटेशन फी देतो, साध्या साध्या व्यवहाराची पावती घेत नाही, सिग्नलला पकडले कि लाच देऊन पसार होते आणि नकळत भ्रश्टाचार पोसतो.  माझा एक मित्र आहे. वीस वर्षांपूर्वीचा त्याचा तालुक्याच्या ठिकाणी आलेला आर टी ओ चा अनुभव वाचा - त्याने ठरवले कि काही झाले तरी दुचाकीच्या लायसन्स साठी तो एजंट वापरणार नाही. त्याने स्वत: अर्ज केला, तो भरला, कागदपत्रे सर्व लावली. त्याला ट्रायल साठी बोलावले गेले. आपली नवी दुचाकी घेऊन तो गेला. पण त्याला अधिकाऱयांनी पास केले नाही. गाडी नवी असल्यामुळे त्यात काही खुसपट काढता आले नाही पण तुला अमुक रुल माहीत आहे का - तमुक क्लॉज माहीत आहे का वगैरे नसते प्रश्न विचारून हैराण केले. दहा महिने त्याने खेपा घातल्या पण लायसन्स मिळाले नाही शेवटी वैतागून त्याने एजंट वापरला आणि कुठेही जायला न लागता त्याला १० दिवसात लायसन्स घरपोच मिळाले. त्याने हा अनुभव आम्हाला सांगितल्यावर आम्ही काय ठरवले असणार? अर्थात एजंट वापरून आपले लायसन्स काढायचे. भ्रश्टाचार हा शिश्टाचार होतो तो हा असा! 
कित्येक लोक कर भारत नाहीत तो बुडवतात - बुडालेला कर काळा पैसा तयार करतो. जमिनीचे व्यवहार होतात - त्याची किंमत कमी दाखऊन कर बुडवला जातो, राजकीय पुढाऱयांचे व्यवहार होतात त्यात कमिशन घेतले जाते, उद्योगपतींना कर्जे दिली जातात - ती बुडवली जातात त्यातून काळा पैसा तयार होतो. हे सगळे व्यवहार सामान्य माणसाच्या कक्षेबाहेर असतात. बिचारा पगारदार असणारा सामान्य माणूस - त्याचा आयकर आधीच कापून घेतला जातो. त्याला काहीच पर्याय नसतो. सामान्य माणूस कर्ज मागायला गेला तर त्याला डझनांनी पेपर आणि प्रूफ आणायला सांगितले जाते तर माल्या सारख्या उद्योगपतींना कोट्यवधी ची कर्जे पायघड्या घालून आणि काहीच तारण न घेता मंजूर केली जातात. सामान्य माणसाला त्याच्या आयकराच्या बदल्यात काय मिळते? काहीच नाही! परदेशात निदान कर देणार्या नागरिकाला मेडिकल सुविधा, पेन्शन, प्राथमिक गरजा पूर्ण करण्याची शाश्वती मिळत असते - इकडचा सामान्य कर भरून शेवटी निवृत्त झाला कि निरुपयोगी पदार्थासारखा बाहेर रस्त्यावर फेकला जातो आणि पेन्शन साठी आपण जिवंत असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आणि महिन्याचे पेन्शन घेण्यासाठी रांगा लावून खेटे मारत राहातो.    

काही उद्योजक म्हणतात कि सरकार सुविधा उपलब्ध करून देत नाही, वीज नाही, पाणी नाही, रस्ते नाहीत, बंदरे नाहीत. ठीक आहे. हि परिस्थिती कोंबडी पहिली की अंडे पहिले अशी आहे. सर्वानी प्रामाणिकपणे सर्व कर भरा आणि सरकारने मग जर काम नाही केले, सुविधा उपलबध करून नाही दिल्या तर जाब विचारा नाहीतर त्यांना पद्च्युत करा. आज अचानक विरोधी पक्षांना सामान्य माणसांच्या रांगेत उभ्या राहण्याच्या हाल अपेष्टांची जाणीव झाली आणि सगळे एकत्र होऊन सरकार विरोधी आंदोलनासाठी उभे राहिले. त्यांची मागणी काय तर पूर्वीच्या नोटा रुजू करा? का सामान्य माणसासाठी कि त्यांच्या स्वता साठी? आम्ही देवळात रांगेत उभे राहातो, विमानतळावर रांगेत उभे राहातो त्यावेळी जेव्हा हे नेते तेथे येतात तेव्हा व्ही आय पी म्हणून का पुढ जातात? ते का नाही रांगेत उभे राहात? त्यांना का नाही तेव्हा आमचा कळवळा येत? ह्या विरोधकांनी उलट सरकार ला त्यांच्या निर्णयाबद्दल सपोर्ट केले पाहिजे आणि नागरिकांना काय सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत ह्याचा विचार विनिमय केला पाहिले त्या ऐवजी ज्या प्रकारे हे विरोधक गेला काढत आहेत ते पहाता त्यांना स्वत ची आणि स्वताच्या काळ्या पैशाची जास्त फिकीर आहे ह्याची खात्री पटते. 

मोदी प्रामाणिक आहेत. इतर राजकीय नेत्यांसारखे त्यांचे कोणी नातेवाईक कुठेच उच्च पदावर कार्यरत नाहीत. मोदी स्वत: कोणत्याच घोटाळ्यात अडकलेले नाहीत. ते २० - २० तास  काम करत आहेत. सर्व विदेशी नेते त्यांना आता मानत आहेत एवढेच न्हवे तर त्यांच्या ह्या धाडसी निर्णयाचे बर्याच राष्ट्रनेत्यांनी स्वागत केले आहे. बर्याच दिसांनी एक द्रष्टा नेता आपल्याला लाभला आहे आणि तो देशहिताचा निर्णय घेत आहे हे लोकांना पटलेले आहे आणि त्यामुळे ओळ सहनशील राहून सहकार्य करत आहेत. पुढे पाऊल मोदी कदाचित स्विस बँकेतल्या पैशावर उचलतील अशी आशा लोकांना वाटते आहे. ही संधी सोडली तर पुन्हा असा निर्णय घेणारा नेता मिळेल का अशी एक भीती पण लोकांच्या मनात आहे. आपला देश स्वच्छ व्हावा, करप्शन फ्री व्हावा असे जनतेला आणि युवा पिढीला वाटते आहे. स्वातंत्र्या पूर्वी ब्रिटीशानी लुटले आणि स्वातंत्र्या नंतर आपल्याच नेत्यांनी लोकांचा पैसा आणि देशाला आणि आपल्याच लोकांना लुटले हि भावना सामान्य लोकांच्या मनात भरून राहिलेली आहे. त्यामुळे मोदींना ५० दिवसाचा अवधी देण्यास लोक तयार आहेत. कोणताही निर्णय घेतला तरी तो परिपूर्ण असू शकत नाही. सरकारने हा निर्णय जाहीर करण्याआधी नव्या २००० च्या, १००० च्या आणि ५०० च्या नोटा तयार ठेवल्या पाहिजे होत्या, निदान नव्या नोटांची साईझ बदलता कामा नये होती वगैरे वगैरे. कदाचित त्यांनी ह्या गोष्टी ध्यानात घेऊन निर्णय घेतला असेल पण त्याचे एक्झेक्युशन बरोबर झाले नसावे. जे काही असेल ते असो पण नवा देश घडतो आहे आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत ह्याचा आजच्या नागरिकाला अभिमान वाटत आहे. पुढच्या पिढीला एक चांगला देश, स्वच्छ देश पाहायला मिळेल असा आशावाद आहे. दुसर्या महायुद्धानंतर युरोपिय देश बेचिराख झाले; त्यावेळची आणि त्यापुढच्या पिढीने त्याग केला, कष्ट उपसले, मेहनत केली, नवा देश उभा केला - कोणासाठी पुढच्य पिढीसाठी - त्यामुळे युरोपीय देश पुढारलेले झाले. असाच काहीसा आशावाद आज लोकांमध्ये आहे. युरोपीय देशात आज ७० ते ८० टक्के व्यवहार कॅशलेस आहे. अमेरिकेत १०० च्या वर करन्सी  नाही! त्यांनी १९६९ मध्येच निर्णय घेऊन १०० च्या वरच्या नोटा रद्द करून टाकल्या आणि पुन्हा कुठल्याच राष्ट्राध्यक्षाने वरच्या नोटा चलनात आणल्या नाहीत. युरोप मध्ये १०० युरो च्या नोटा सहजी स्वीकारल्या जात नाहीत.   तर आजचा हा चलन बदल लोकांनी देश बदलेल म्हणून स्वीकारला आहे. 

चलन बदलून देश बदलेल? तुम्हाला काय वाटते? देश काय मोदी सारखा कोण एक माणूस बदलू शकतो ? हे असे काम केवळ दुसर्याने करायचे असते? आपले काहीच योगदान नाही? देशाच्या नागरिकांचे काहीच कर्तव्य नाही? मी सर्व कर भरेन आणि सर्व व्यवहाराची पावती मागेन , मी रहदारीचे सर्व नियम पालन करेन, मी गैर व्यवहार करणार नाही आणि करू देणार नाही, मी शिस्त सर्व सार्वजनिक ठिकाणी पालन कारेन, मी डोनेशन देणार नाही, कॅपिटेशन फे देणार नाही, मला आरक्षण नको, मी मतदान करणे बुडवणार नाही, मी योग्य नेता निवदेन, मी वशिलेबाजी करणार नाही, मी भ्रश्टाचाराला प्रोत्साहन देणार नाही, मी माझया कामाशी प्रामाणिक राहीन, मी सरकारी कर्मचारी असें तर कामात टंगळमंगळ आणि टाईमपास करणार नाही, मी लाच घेणार नाही व देणार नाही, मी सर्व व्यवहार ब्यांके मार्फत करेन, मी काळा पैसा जमा करणार नाही. मला वाटते आपल्याला एक सुजाण नागरिक म्हणून आपले चाल- चलन बदलावे लागेल. हे जेव्हा होईल तेव्हा देश बदलेल नुसते चलन बदलून नाही. तुम्हाला काय वाटते?

प्रकाश सावंत